भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जोरदार निषेध केला आहे. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. शांतता राखण्याच्या आमच्या प्रयत्नांना दुबळेपणा समजू नये, अशी प्रतिक्रिया शरीफ यांनी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना दिली. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयनेही (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) या हल्ल्याची दखल घेतली आहे. आयएसआयच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील भिंबेर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा या सेक्टर्समध्ये कारवाई केली. दरम्यान, नवाज शरीफ यांनी नियंत्रण रेषेवर दोन पाकिस्तानी सैनिकांना मारण्याच्या कृत्याचाही निषेध केला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला; संरक्षण मंत्रालयाची माहिती 
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स केल्याची माहिती गुरूवारी संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. काही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर एकत्र आल्याची विश्वसनीय माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने या दहशतवादी तळावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले असून त्यांचे गंभीर नुकसान झाल्याची माहिती भारतीय लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमिद अंसारी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या #SurgicalStrikes ची माहिती दिली होती.
भारताला नेस्तनाबूत करण्याची पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याची धमकी