आम्ही काय खावे हे दिल्ली आणि नागपूरकरांनी शिकवू नये असे सांगत केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. केरळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना त्यांनी भाजपच्या निर्णयावर सडकून टीका केली.

नुकतीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही आठवडी बाजारात होणाऱ्या दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी आणली आहे. त्यामुळे देशातील अनेकांना खाण्याच्या सवयींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर विजयन यांनी चांगलीच आगपाखड केली.

केंद्रात सत्तेत असणारे सरकार आपल्या भूमिका देशभरात लादू पहात आहेत. मात्र केरळमधील लोकांच्या खाण्याच्या सवयी अतिशय चांगल्या असून दिल्ली आणि नागपूर मधून केरळी लोकांना खाण्याच्या बाबतीतले धडे घेण्याची आवश्यकता नाही, असे विजयन यांनी सांगितले. केरळी लोक खाण्याच्या आरोग्यदायी आणि पोषणमूल्ये असणाऱ्या पारंपरिक पद्धती अवलंबतात.

केरळमधील ज्येष्ठ नेते कोडीयेरी बालकृष्णन याबाबत म्हणाले, केंद्राकडून देशात सर्व ठिकाणी समान संस्कृतीसाठी आरएसएसचा अजेंडा राबविण्याचा आग्रह धरला जात आहे. एक देश, एक संस्कृती आणि एक पक्ष याचा आग्रह भाजपकडून होत आहे. केंद्र सरकारने दुभत्या जनावरांच्या विक्रीवर आणलेली बंदी याच दिशेने जाणारे एक पाऊल आहे, जे खपवून घेतले जाणार नाही.