लाहोरमधील एका उद्यानात रविवारी आत्मघातकी स्फोट घडवून आमचे पंजाब प्रांतात आगमन झाले असल्याचा इशारा देणारा संदेश या स्फोटामागे हात असलेल्या पाकिस्तान तालिबानने सरकारला दिला आहे. या स्फोटात गंभीर जखमी झालेली दोन मुले मंगळवारी जिना रुग्णालयात मरण पावल्याने मृतांची संख्या ७४ झाली असल्याचे आपत्कालीन सेवा विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. या स्फोटात जखमी झालेल्या अन्य १०० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे प्रवक्त्याने सांगितले. हल्लेखोर साधारणपणे २० वर्षांचा होता आणि त्याने गुलशन-ए-इक्बाल उद्यानात स्वत:ला उडविले.
इस्टरचा सण साजरा करण्यासाठी हजारो जण उद्यानात जमलेले असताना हल्लेखोराने स्फोट घडविला. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा फुटीर गट असलेल्या जमातुल अहरारने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, ख्रिश्चनांना लक्ष्य करण्यासाठी सदर हल्ला करण्यात आल्याचा दावा जमातुल अहरारने केला आहे.