भारत- पाकिस्तानदरम्यानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बोलणी केवळ दहशतवादावर व्हावीत या आपल्या भूमिकेवर भारत कायम असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले. काश्मिरी फुटीरवाद्यांच्या मुद्दय़ावर ही बोलणी झाकोळली आहेत.
या बोलण्यांचा अॅजेंडा रशियातील उफा येथे निश्चित करण्यात आला होता यावर भर देऊन, पाकिस्तानने या अॅजेंडय़ापासून ढळू नये असे सिंह म्हणाले. हा अॅजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ या दोघांनीही मान्य केला होता, याचा त्यांनी उल्लेख केला.दिल्ली येथे रविवारपासून होणारी बोलणी रद्द केली जाऊ शकतील काय, या प्रश्नावर, भारत चर्चेच्या विषयावर कायम असून हा विषय बदलला जाऊ शकत नाही, तसेच याबाबतचा निर्णय पाकिस्तानला घ्यायचा आहे, असे ते उत्तरले.फुटीरवादी हुर्रियत नेत्यांशी चर्चा करण्याबाबत पाकिस्तान आग्रही असल्याचा उल्लेख केला असता गृहमंत्री म्हणाले की, भारत बोलणी करण्यास तयार आहे, परंतु आमच्या शेजारी देशाला बोलणी करायची आहेत की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे.