पाकिस्तानला भारतासोबत शांततापूर्ण संबंध राखायचे आहेत. मात्र भारतालाच यामध्ये रस नाही, असे विधान पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी केले आहे. भारतासोबत सलोख्याचे संबंध राखण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. मात्र भारताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, असेही बाजवा म्हणाले.

पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन्ही सीमांवर असलेल्या अस्थिर परिस्थितीवरही भाष्य केले. ‘पाकिस्तानच्या दोन्ही सीमांवरील परिस्थितीत सतत बदल होत आहेत. पूर्वेला आक्रमक भारत आणि पश्चिमेला अस्थिर अफगाणिस्तान असल्याने, याचे परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागतात. दोन्ही सीमांवरील परिस्थिती अशांत असल्याने त्याचा परिणाम देशात पाहायला मिळतो. सीमेवर सतत अस्थिर वातावरण असल्याने देशातील परिस्थिती नकारात्मक होते,’ असे बाजवा यांनी म्हटले. अफगाणिस्तान सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्यासह आर्थिक आणि राजनैतिक मार्गांचा वापर सुरु असल्याचेही ते म्हणाले.

पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. ‘देशासाठी नंतर धोकादायक ठरणाऱ्या गोष्टींचा सामना आताच करायला हवा,’ असेही पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी म्हटले. देशाच्या बुडीत चाललेल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना त्यांनी हे विधान केले. ‘इंटरप्ले ऑफ इकॉनॉमी अॅण्ड सिक्युरिटी’ या विषयावर कराचीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी कमर बाजवा यांनी तुटपुंज्या कर संकलनाबद्दल काळजी व्यक्त केली. ‘देश प्रगती करतो आहे. मात्र देशावरील कर्जाचा डोंगर वाढतोच आहे. करांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न अतिशय कमी आहे. या उत्पन्नात वाढ होण्याची गरज आहे. यासाठी करदात्यांचे प्रमाणदेखील वाढायला हवे. याशिवाय आर्थिक शिस्त राखण्याची आणि आर्थिक धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये दीर्घ कालावधीपर्यंत सातत्य राहिल, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.