राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून दलित आणि मुसलमानांविरोधासाठी दसऱ्याला शस्त्रांची पूजा केली जाते, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. राजकोट येथे राष्ट्रीय दलित अधिकारांसाठी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी आंबेडकर यांनी संघाच्या भूमिकेबाबत काही प्रश्न उपस्थित केले. दलितांनाही हिंदू मंदिरात न जाण्याचा सल्ला दिला. तसेच देशातल्या विविध भगव्या संघटना या मनुवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ शस्त्रांची पूजा का करतात, हे कळत नाही. पूर्वीच्या काळी राजेशाहीत आपल्या राज्याचे रक्षण व्हावे, शत्रूवर आपला दबदबा राहावा यासाठी त्या राजाकडून असे पूजन केले जात. परंतु, भारत आता स्वतंत्र देश आहे. संघाला यातून काय दाखवायचे आहे. आम्हाला शांतता आणि सलोखा हवा आहे, असे ते म्हणाले.
देशातील भगव्या संघटनांना मनुवाद हवा आहे. उच्च जातीतील लोकांना दलित त्यांच्या अधिपत्याखाली राहावे, असे वाटते. संघाचे शत्रू कोण आहेत, कोणाविरोधात त्यांना हे शस्त्रे वापरायची आहेत. पाकिस्तानचे लोक येथे येऊन हल्ले करून परत जातात. परंतु संघ, विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दलाच्या कार्यकत्र्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन बॉम्बस्फोट केल्याचे तुम्ही कधी ऐकलंय का? जर त्यांनी तेथे जाऊन त्यांनी हल्ले केले असते तर समजू शकलो असतो. पण तसेही काही नाही.
..तर संघाच्या निम्म्या शाखा बंद होतील
या वेळी त्यांनी दलितांना हिंदू मंदिरात न जाण्याचा सल्ला दिला. मंदिराचा सर्व पैसा संघ आपल्या कार्यक्रमासाठी वापरतो. देशातील छोटया मंदिराची कमाई ही ४० हजार कोटी इतकी आहे. या पैशांचा वापर संघ स्वत:साठी व शस्त्रे जमवण्यासाठी करतो. जर दलितांनी मंदिरात जाऊन देणग्या देणे बंद केले तर संघाच्या निम्म्या शाखा बंद पडतील असे त्यांनी या वेळी म्हटले.