भारतीय अर्थव्यवस्था अतिशय मजबूत असून, युरोपियन महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्यामुळे होणाऱया परिणामांना सामोरे जाण्यासाठी आपला देश समर्थ असल्याचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा कौल तेथील जनतेने दिल्यानंतर अरुण जेटली यांनी त्वरित एक निवेदन प्रसिद्ध केले. ब्रेक्झिटमुळे होणाऱया परिणामांची भारतीयांना चिंता करण्याचे गरज नसल्याचे जेटली यांनी निवेदनात म्हटले आहे.
भारताकडे परकीय चलनाचा मुबलक साठा आहे. त्यामुळे ब्रेक्झिटच्या परिणामांचा भारतासारख्या प्रबळ अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँक, सरकार आणि इतर नियामक मंडळे संयुक्तरित्या देशाच्या आर्थिक परिस्थितीतीकडे लक्ष ठेवून काम करत आहेत. ब्रेक्झिटमुळे होणाऱया परिणामांची तीव्रता कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असेही जेटली पुढे म्हणाले.