‘कनेक्टीकट’ येथील शाळेमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण गोळीबाराने २० विद्यार्थ्यांसह २६ जणांचा बळी घेतल्यानंतर अमेरिकेमध्ये शस्त्र नियंत्रण कायदा करण्याबात जनमताचा दबाव वाढला आहे. २० एप्रिल १९९९ रोजी कोलंबियन हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्यांने अंधाधुंद गोळीबार केला होता. त्यात १२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झालेल्या या घटनेने अमेरिकेत मुक्तहस्ते होणाऱ्या बंदूक वापराबद्दल संताप व्यक्त व्हायला लागला. मायकेल मूर या माहितीपटकर्त्यांने त्यावर तिखट माहितीपट काढून लोक दुकानातून इतर वस्तूंप्रमाणे बंदुक किती सहज खरेदी करू शकतात हे दाखवून दिले होते. मूरचा हल्ला बुश प्रशासनाचे वाभाडे काढण्याच्या उद्देशाने होता. मात्र बुश यांच्यानंतर दोनदा राष्ट्राध्यक्षपदाची माळ घेतलेल्या बराक ओबामा यांच्या कारकीर्दीतही अमेरिकेमध्ये अंदाधुंद गोळीबारसत्र काही थांबू शकलेले नाही. त्यात कनेक्टिकमध्ये हिंसाचाराने शिखर गाठून निष्पाप बालकांचा बळी घेतल्यामुळे, आतातरी शस्त्रनियंत्रण कायदा अमेरिकी प्रशासन राबवेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.    
पळवाट
 शस्त्रास्त्र नियंत्रण कायद्याचा विरोध करणारी ‘ नॅशनल रायफल असोसिएशन ’ बंदुक लोकांना मारत नाही, माणसे माणसांना मारतात, असा दावा कायम करीत आली आहे. नॅशनल रायफल असोसिएशनने २००७ मध्ये बुश प्रशासनामध्ये लॉबी करून गन कन्ट्रोल विधेयक राबवू दिले नाही. अमेरिकेमध्ये ४७ टक्के नागरिकांकडे स्वसंरक्षणार्थ म्हणून खरेदी केलेली शस्त्रास्त्रे आहेत. कुणालाही दुकानातून सहज बंदुक विकत घेता येते. अमेरिकेमध्ये व्यक्तिगत शस्त्रास्त्र खरेदीमध्ये २००८ नंतर प्रचंड मोठी वाढ झाल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. ओबामा शस्त्रास्त्र बंदीचा कायदा राबवतील किंवा शस्त्रास्त्र हाताळणीवरचा कर वाढवतील या भीतीने ही खरेदी वाढल्याचे सीएनएनने म्हटले आहे.
पहिले पाऊल
अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये याबाबत तातडीने विधेयक मांडण्यासाठी शुक्रवारी सह्य़ांद्वारे करण्यात आलेल्या मागणीमध्ये ४३ हजार नागरिकांनी पाठिंबा दर्शविला. ४३ हजार सह्य़ांनीशी याबाबतची मागणी व्हाइट हाऊसमध्ये मांडण्यात आली. व्हाइट हाऊसमध्ये एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी किमान २५ हजार नागरिकांचा त्याबाबत पाठिंबा असावा लागतो.
३०००
९/११च्या हल्ल्यातील मृतांची संख्या
१ लाख २० हजार
अमेरिकेत ९/११ नंतर पुढील दहा वर्षांतील मृतांची संख्या