शारदा चिट फंड घोटाळ्यात पक्षाच्या नेत्यांना झालेला तुरुंगवास, निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे पहिल्या फळीतील नेते पैसे स्वीकारत असतानाच ‘नारदा’ ने केलेला भांडाफोड, डावे आणि काँग्रेसची आघाडी हे सारे प्रतिकूल मुद्दे असतानाही विक्रमी मते मिळवीत पुन्हा सत्तेत येण्याची किमया ममता बॅनर्जी यांनी साधली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून डाव्यांनी ममतादिदींची प्रचारात कोंडी केली होती. सुमारे महिनाभर चाललेल्या निवडणूक प्रक्रियेच्या काळात ममतांना विविध आरोपांचा सामना करावा लागला. त्यातच दिदींचा संयम सुटला होता, पण मतदारांनी पुन्हा एकदा त्यांनाच पसंती दिली.
सत्तेत आल्यापासून ममता बॅनर्जी यांनी ग्रामीण भागात पक्षाची पाळेमुळे घट्ट बांधली. भ्रष्टाचारांचे आरोप किंवा शारदा आणि नारदामुळे शहरी भागांत वातावरण काहीसे प्रतिकूल होते. विशेषत: सोशल मिडियामधून तृणमूल काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. पण ग्रामीण भागातील मतदारांनी दिदींना साथ दिली. भाजपनेही दिदींना मदत होईल, अशा पद्धतीने डावपेच आखले. भाजपचे तीन आमदार निवडून आले आहेत. डावे आणि काँग्रेस एकत्र आल्याने दिदी आणि भाजप यांच्यात पडद्याआडून समझोता झाल्याचा आरोप झाला होता. बंगालमधील सुमारे ३२ टक्के मुस्लीम मतदारांचे प्रमाण लक्षात घेता भाजपशी जवळीक साधली हा प्रचारही दिदींना महागात पडला असता. यामुळेच भाजप आणि काँग्रेसपासून समान अंतर ठेवण्याचे धोरण दिदींनी घेतले होते.
गेली पाच वर्षे ममतांनी राज्याच्या विविध भागांमध्ये दौरे करून विविध कामे मार्गी लावली. डाव्या सरकारच्या काळात विकास कामे होत नव्हती, पण आपण विकास कामांना प्राधान्य दिले, असे ममता नेहमीच सांगत असत. ग्रामीण भागात सरकारी कारभाराबाबत फरक जाणविल्याने या भागातील मतदारांनी ममतांना साथ दिली. सुमारे तीन दशके सत्तेत असलेल्या डाव्यांची मक्तेदारी ममतांनी ग्रामीण भागात मोडून काढली होती.
डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये झालेली आघाडी मतदारांना फारसी रुचली नाही. काँग्रेसबरोबर आघाडी करण्यावरून डाव्या पक्षांमध्ये मतभेद होते. विशेषत: प्रकाश करात यांचा काँग्रेसबरोबर आघाडीस विरोध होता. सीताराम येचूरी यांनी काँग्रेसबाबत अनुकूल भूमिका घेतली. आघाडी केल्याने डाव्यांचे नुकसानच झाले. डाव्यांना एकूण मतांच्या १९ टक्के तर काँग्रेसला १२ टक्के मते मिळाली असली तरी काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या वाटय़ाला जाणार आहे. काँग्रेसबरोबर आघाडी करून पक्षाने नुकसान करून घेतले, अशी डाव्या नेत्यांची प्रतिक्रिया आहे.

– संतोष प्रधान