पश्चिम बंगाल येथील मिदनापूर जिल्ह्यात दोन प्रवासी ट्रेन्सची टक्कर झाली. या घटनेत चारजण जखमी झाले. ‘बालीचक हावडा लोकल’ आणि ‘मिदनापूर हावडा ‘या दोन ट्रेन्सची ही टक्कर पंसकुरा भागातील खैरी स्टेशनजवळ झाली. जखमींवर जवळच्याच रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. या दोन्ही ट्रेनचा वेग कमी होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली अशी माहितीही समोर येते आहे.

दुसऱ्या एका घटनेत हावडा वर्धमान कॉर्ड सेक्शनमध्ये एक रेल्वे अपघात होता होता टळला. रेल्वे रूळांची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याने रेल्वे रूळाला तडा दिल्याची बाब तातडीने लक्षात आणून दिली. ज्यानंतर या मार्गावरची वाहतूक थांबवण्यात आली. शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शंकर नावाच्या रेल्वे कर्मचाऱ्याला रूळाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्याने तातडीने याची सूचना दिली. या सूचनेमुळे मोठा अपघात टळला अशी माहिती रेल्वेचे माजी प्रवक्ते आर. एन. महापात्रा यांनी दिली.