पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद वैद्यकीय रुग्णालयाच्या औषध विभागात शनिवारी दुपारी आग लागली. या आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काही जण रुग्णालयातच अडकल्याची माहिती समोर येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आता घाबरु नये असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

शनिवारी दुपारी मुर्शिदाबाद रुग्णालयात औषध विभागात आग लागली. आगीचे लोट आणि धूर यामुळे रुग्णालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घाबरलेल्या रुग्णांनी खिडकीच्या काचा फोडून रुग्णालयातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला. तर नवजात बाळांना बाहेर काढण्यासाठी पालकांची धावाधाव सुरु झाली. त्यामुळे गोंधळात भर पडत गेली. या आगीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. एसीमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आग लागल्यानंतर रुग्णांमध्ये कमालीचा गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळामुळे चेंगराचेंगरीही झाली असती अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.