पश्चिम बंगालमध्ये भाजपचा स्थानिक नेता महेश शर्माकडून दोन हजार रुपयाच्या नवीन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. शर्माकडे सुमारे ३३ लाख रुपयांच्या नवीन नोटा होत्या अशी माहिती समोर येत आहे. महेश शर्माने २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत राणीगंज मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

पश्चिम बंगाल पोलिसांनी मंगळवारी महेश शर्मासह काही खाणमाफियांना अटक केली आहे. पैशांचा अपहार केल्याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली असून पोलीस तपासात महेश शर्माकडे दोन हजारच्या नवीन नोटाही आढळल्या आहेत. शर्माकडे सुमारे ३३ लाख रुपयांच्या नवीन नोटा असल्याची माहिती समोर येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी शर्मा हा भाजपचा नेता असल्याचे म्हटले आहे. महेश शर्माने विधानसभा निवडणुकीत राणीगंजमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शर्माला तिस-या स्थानी समाधान मानावे लागले होते. शर्माला उमेदवारी दिल्याने पश्चिम बंगालमधील भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख शकील अन्सारी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. शर्मा यांच्याकडे असलेल्या पैशामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली असा आरोप अन्सारी यांनी केला होता. महेश शर्मा अजूनही भाजपमध्ये आहेत की नाही याविषयी संभ्रम आहे. भाजपकडून अद्याप या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.