ब्रिटनच्या संसदेजवळील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. वेस्टमिंस्टर पुलाजवळ गोळीबार, पादचाऱ्यांना कारने चिरडणे, चाकू हल्ला अशा घटना काल, बुधवारी घडल्या होत्या. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर ४० जण जखमी झाले होते. ठार झालेल्यांमध्ये एक हल्लेखोर आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. हल्ल्यानंतर लंडन पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. लंडन आणि बर्मिंगहॅममध्ये सहा ठिकाणी पोलिसांनी छापे मारले. यात सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर लंडन पोलिसांनी सहा ठिकाणी छापेमारी केली. यात सात इस्लामी दहशतवाद्यांना अटक केली आहे. ब्रिटन संसदेजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. लंडन आणि बर्मिंगहम शहरात पोलिसांनी छापेमारी केली. पंतप्रधान थेरेसा मे यांनी संसदेत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्लेखोर ब्रिटनमध्ये जन्मलेला होता. सुरक्षा दलांनी केलेल्या चौकशीत हल्लेखोर कट्टरपंथी असल्याचे समोर आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, संसदेजवळ हल्ला झाला त्यावेळी दोनशेहून अधिक खासदार संसदेत उपस्थित होते. ते सर्व सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सुरक्षा वाढवली होती. लंडनमधील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली होती. घटनेनंतर पोलिसांनी सहा ठिकाणी छापेमारी केली. यात सात जणांना संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्यांचा या हल्ल्यामध्ये हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.