मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘काळा गॉगल’ लावून भेटल्याने आयएएस अधिकारी अमित कटारिया चांगलेच चर्चेत आले होते. पंतप्रधानांची भेट घेताना ‘प्रोटोकॉल’ न पाळल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. आता पुन्हा एकदा अमित कटारिया चर्चेत आले आहेत. मात्र आता कटारिया यांच्या नावाची सकारात्मक चर्चा सुरु आहे. कारण केंद्र सरकारकडून कटारिया यांना प्रमोशन देण्यात आले आहे. अमित कटारिया यांची थेट केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एका कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचे योग्य बक्षीस मिळाल्याची चर्चा दिल्लीतील प्रशासकीय वर्तुळात आहे.

प्रशासकीय अधिकारी असलेल्या अमित कटारिया यांनी गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींना भेटताना काळा चष्मा घातला होता. त्यावेळी कटारिया यांनी प्रोटोकॉल मोडल्याची मोठी चर्चा झाली होती. यावेळी सरकारकडून कटारिया यांना नोटीसदेखील बजावण्यात आली होती. मात्र आता कटारिया यांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि कार्यक्षमतेची सरकारने दखल घेतली आहे. निर्भीड आणि प्रामाणिक अधिकारी अशी कटारिया यांची ओळख आहे. प्रशासकीय कारभार लोकाभिमुख असावा, याची कटारिया यांनी नेहमीच काळजी घेतली आहे. त्यामुळेच छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये सेवा बजावलेल्या कटारिया यांना मोदी सरकारने थेट दिल्लीत बढती दिली आहे. आता त्यांच्याकडे शहर विकास मंत्रालयाच्या उपसचिवपदाची धुरा असणार आहे.

अमित कटारिया यांना थेट दिल्लीत बढती देऊन मोदी सरकारने त्यांची कामाची योग्य दखल घेतली आहे. शहर विकास मंत्रालयातील भूविकास अधिकारी म्हणून आता कटारिया काम पाहणार आहेत. अमित कटारिया यांनीच याबद्दलची माहिती फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. कटारिया यांनी छत्तीसगडमध्ये केलेले काम पाहून त्यांना ही बढती देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या अधिकाऱ्यांची केंद्र सरकारकडून बदली करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कटारिया यांना बढती देण्यात आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे.