व्हॉट्सअॅप मेसेंजरवरुन केलेले चॅट आणि डाटा डिलिटच होत नाहीत अशी माहिती ‘आयओएस‘मधील तज्ज्ञ संशोधक जॉनाथन झिझारस्की यांनी दिली आहे. जगातील बहुचर्चित आणि सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅपला अनेकांचीच पसंती आहे. अनेक अपडेट्ससह बहुतेकांच्या वापरात असणाऱ्या व्हॉट्सअॅप द्वारे ते वापरणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जातच आहे.
व्हॉट्सअॅपची हीच कार्यप्रणाली पाहण्यासाठी झिझारस्की यांनी व्हॉट्सअॅप मेसेंजर वापरत काही काळानंतर त्यांनी सर्व चॅट डिलिट करत त्याचा बॅकअप घेतला. पण त्यांनी डिलिट केलेल्या चॅटचा सर्व डेटाच मोबाईल बॅकअपमध्ये तसाच असल्याचे त्यांना आढळले. हा सारा प्रकार आणि त्यातील काही तांत्रिक बाबींचे स्पष्टीकरण देत हे सर्व करण्यामागे व्हॉट्सअॅपचा काहीही उद्देश नाही आहे असेही ते म्हणाले आहेत. मेसेज डिलिट न होण्याचा हा प्रकार सध्या फक्त ‘आयओएस’ कार्यप्रणालीवर चालणाऱ्या मोबाईलमध्येच आढळला असून इतरांनी यात काळजी करण्यासारखे काही कारण नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.