गव्हाची जनुकीय संकेतावली व क्रमवारी तयार करण्याचा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण केला जाणार असून त्यामुळे चांगल्या प्रजातीच्या गव्हाची खरेदी करणे शक्य होणार आहे असे भारतीय कृषी संशोधन परिषदेने म्हटले आहे.
फ्रान्सच्या समूहाने २००५ पूर्वी गव्हाची जनुकीय संकेतावली तयार करण्याचे काम सुरू केले असून ते एका गुणसूत्रापुरते पूर्ण करण्यात यश आले आहे. गोपाल प्रसाद यांनी माहिती अधिकारात ही माहिती मिळवली असून त्यानुसार आंतरराष्ट्रीय गहू जनुकीय संकेतावली महासंघात भारताचा समावेश असून हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल. संपूर्ण गव्हाची जनुकीय संकेतावली तयार करण्यात अजून यश आलेले नाही. त्यात बरेच काम बाकी आहे.
साधारण ३९ अंश तापमानाला टिकू शकेल अशी गव्हाची प्रजाती शोधण्यात यश आले आहे काय, असे विचारले असता भारतीय कृषी संशोधन परिषदेने म्हटले आहे की, एवढे तापमान फक्त गव्हाच्या वन्य प्रजातीच सहन करू शकतात. मध्यपूर्वेत गव्हाच्या प्रजाती १९६० पासून गोळा करण्यात आल्या आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तापमान वाढीने दुष्काळ, पूर येतात, जमिनाचा पोत बदलतो. पेरणीच्या वेळी तापमान जास्त असेल तर त्याचा वाईट परिणाम होतो. दुष्काळाला प्रतिबंध करणाऱ्या सी ३०६ व डब्ल्यू ७११ या प्रजाती असून त्यांचा संकर करण्याचा विचार चालू आहे. जे डीएनए गव्हाच्या गुणधर्माचे नियंत्रण करतात त्यांचा अभ्यास करूननवीन प्रजाती तयार केली जाणार आहे.