देशात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचे वाढते प्रमाण पाहता सध्या सामाजिक वर्तुळांमध्ये या विषयावरील विविध चर्चांना बरीच हवा दिली जात आहे. याच वाहत्या गंगेत हात धुवत, गुजरातमध्ये दलितावर झालेल्या अत्याचाराविषयी पंतप्रधानांनी घेतलेल्या मौनावर कॉंग्रेस पक्षाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षातील जेष्ठ नेते अहमद पटेल यांनी ट्विटरवरुन ‘मतं मागत फिरणारे पंतप्रधान आता जेव्हा दलितांवर अत्याचार होत आहे अशा वेळी कुठे आहे?’ असे प्रश्नार्थक विधान केले आहे.
तत्पूर्वी गुजरातमधील उना येथील अत्याचार पिडीतांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली हजेरी लावली होती. हा प्रसंग ओढवल्यानंतर प्रफुल्ल पटेल, आनंदीबेन पटेल यांसारख्या राजकारण्यांनी अत्याचार पिडीतांची भेट घेत त्यांना सहानुभूती दिली होती. राहुल गांधी यांनी पिडीतांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘पि़डीतांच्या म्हणण्यानुसार, मोदींच्या गुजरात राज्यात आम्हाला चिरडले जात आहे’ असे मत मांडले. यासंदर्भात पुढे बोलताना एका रुग्णालयाला भेट दिली असता तेथे ११ जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाल्याची माहिती मिळाल्यामुळे ‘या प्रकाराचा अर्थ आहे?, गुजरातमध्ये मागासवर्गीयांना, गरीबांना चिरडले जात आहे, ही लढाई कोणाची आहे?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी उभा करत ही दोन विचारसरणींची लढाई आहे, ज्यात एका बाजूला गांधी, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर आणि नेहरू तर दुसऱ्या बाजूला स्वयंसेवक संघ (आरएसएस), गोलवालकर आणि मोदी आहेत अशी टिका राहुल गांधी यांनी केली. तसेच पिडीतांना उद्देशून, ‘कॉंग्रेस सरकार आणि गुजरातची जनता सदैव तुमची साथ देणार आहे; या अशा विचारसरणीला फक्त गुजरातमध्येच नाही तर सबंध हिंदुस्तानात हरवून दाखवू’ असे हमी देणारे विधानही केले. राहुलच्या या वक्तव्याला निशाणा करत अनेकांनी ट्विटरवरुन त्यांच्यावर उपहासात्मकरित्या टिकेची झोड उठवली आली होती.