प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी या एकदा बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाईला कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या होत्या त्यावेळी त्या ग्रामस्थांशी आस्थेने बोलल्या पण सर्वाचे लक्ष त्यांच्याकडे असलेल्या छानशा छोटय़ा कॅमेऱ्याकडे होते. सीतारादेवी या १९७५ मध्ये अंबाजोगाईला आल्या होत्या. माझे वडील शंकरबापू आपेगावकर यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आल्या होत्या, त्यावेळी यशवंतराव चव्हाण उपस्थित होते, असे पखवाज वादक उद्धव आपेगावकर यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर लगेचच सीतारादेवी यांनी शंकरबापू यांना त्यांच्या मूळ गावी घेऊन जाण्याचा आग्रह धरला. शंकरबापूंना नंतर पद्मश्री किताबही मिळाला होता.
सीतारादेवी यांनी शंकरबापूंना सांगितले की, मला तुमचे खेडे बघायचे आहे व त्यामुळे सगळा काफिला आपेगावकडे वळला, त्यावेळी त्यांना महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची खरी ओळख झाली असे उद्धव सांगतात. सगळे ग्रामस्थ सीतारादेवींना पाहण्यासाठी आमच्या घराभोवती जमा झाले व ते त्यांच्याकडे व त्यांच्या कॅमेऱ्याकडे बघत होते. त्या गुरांच्या गोठय़ाचे, धान्य साठवण्याच्या मातीच्या भांडय़ाचे छायाचित्र घेत होत्या. जेव्हा बापूंनी त्यांना जेवणार का असे विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की, वेगळे काही करू नका तुम्ही ग्रामस्थ जे जेवता तेच करा, त्यांनी ज्वारीची भाकरी व पिठलं, कांदा असा बेत आनंदाने अनुभवला. उद्धव आपेगावकर सांगत होते. ते आता औरंगाबादला संगीतशाळा चालवतात.
आमचे शेजारी अजूनही सीतारादेवींच्या आठवणी काढतात, त्यांचे निस्सीम प्रेम त्यांना आवडले होते. आज त्यांच्या निधनाची बातमी येथे आली तेव्हा त्यावेळी जे पोरसवदा होते त्यांना जिवंतपणी दंतकथा बनलेल्या सीतारादेवींची आठवण आल्यावाचून राहिली  नाही असे उद्धव आपेगावकर यांनी सांगितले.

मान्यवरांनी सितारा देवी यांना वाहिलेली श्रद्धांजली
सितारा देवी यांनी आपले सारे आयुष्य नृत्यासाठी समर्पित केले होते. ‘कथक सम्राज्ञी’ही उपाधी केवळ त्यांच्यासाठीच होती. त्यांच्या निधनाने देशाने सवरेत्कृष्ट कथ्थक नृत्य कलाकार गमावला आहे.
सी. विद्यासागर राव (राज्यपाल)

सितारा देवी यांना ‘खुदा हाफीज’. कथ्थक नृत्य सादरीकरणातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व. त्यांनी कथ्थक नृत्य सादरीकरणातून जो आनंद आणि समाधन दिले, त्याबाबत त्यांचे आभार.  
– झाकीर हुसेन (तबला वादक)