मुगसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय असे करणाऱ्या भाजपने ताजमहालला कसे काय सोडले? त्याचे नाव कसे बदलले नाही. जर भाजपने आपल्या देशाचे नाव बदलले तर, आम्ही रहायचे कोठे? असा खोचक सवाल करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली.


भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची सर्व स्तरातून टीका होत असताना या वादात आता ममता बॅनर्जी यांनीही उडी घेतली आहे. त्या म्हणाल्या, भारताची संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा पद्धशीरपणे उद्धवस्त करण्याचा राजकीय अजेंडा भाजपने आखला आहे. त्यामुळे ताजमहालबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सोम यांचा आम्ही निषेध करतो.

उत्तर प्रदेशचे आमदार संगीत सोम यांनी रविवारी (१५ ऑक्टोबर) जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहालवर वादग्रस्त विधान केले होते. ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवरील डाग असल्याचे सोम यांनी म्हटले होते. ताजमहाल बनवणाऱ्या मुगल शासकांनी उत्तर प्रदेश आणि भारतातील सर्व हिंदूंचा सर्वानाश केला होता. अशा शासकांचे आणि त्यांनी उभारलेल्या इमारतींची नावे जर इतिहासात असतील तर ती बदलण्यात येतील, असे सोम म्हणाले होते.