प्रसारमाध्यमांनी खोटय़ा बातम्या दिल्याचा पुन्हा आरोप

खोटय़ा बातम्या देऊन प्रसारमाध्यमांनी जनतेची दिशाभूल केली असा आरोप अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या शंभर दिवसांनिमित्त केला. त्यांनी व्हाइट हाऊस प्रतिनिधींनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहण्याचे टाळले. गेल्या तीस वर्षांत कुठल्याही अध्यक्षाने असे केले नव्हते. ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच अमेरिकेतील प्रसारमाध्यमांना लक्ष्य केले आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या शंभर दिवसांच्या कारकिर्दीवर प्रसारमाध्यमांनी जे वृत्तांकन केले आहे त्यावर टीका करताना सांगितले की, मी आता वॉशिंग्टनपासून १०० मैल अंतरावर माझी सायंकाळ युवकांसमवेत छान साजरी करीत आहे व हे युवक खूप चांगले आहेत. प्रसारमाध्यमे मात्र अतिशय वाईट आहेत त्यांचा  दर्जा घसरलेला आहे. हॉलिवूडमधील अभिनेते व वॉशिंग्टनमधील पत्रकार हे हॉटेलच्या बॉलरूममध्ये एकमेकांचे सांत्वन  करीत आहेत. २६०० पाहुण्यांची व्यवस्था असलेला भोजन समारंभ आलिशान हॉटेलात आयोजित करण्यात आला होता त्याची त्यांनी खिल्ली उडवली. व्हाइट हाऊस प्रतिनिधींचा मेजवानी कार्यक्रम अध्यक्षांविना  होत आहे असे त्यांनी पेनसिल्वानियातील हॅरिसबर्ग येथे उपस्थित लोकांसमोर सांगितले. पेनसिल्वानियाने ट्रम्प यांना विजयात मोठा हात दिला होता. ते म्हणाले की, मी एकामागून एक आश्वासने पूर्ण करीत आहे, कुणाच्याही संपर्कात नसलेले पत्रकार मात्र खोटय़ा बातम्या देण्यात मश्गुल आहेत. अमेरिकेत गेल्या काही दशकांमध्ये प्रथमच पत्रकारांनी आयोजित केलेल्या मेजवानीस अध्यक्ष उपस्थित नव्हते. व्हाइट हाऊसचे कर्मचारीही तिकडे फिरकले नाहीत. यापूर्वी १९८१ मध्ये अध्यक्ष रोनाल्ड रेगन हे व्हाइट हाऊस प्रतिनिधींनी आयोजित केलेल्या मेजवानीस अनुपस्थित होते.

ट्रम्प यांनी सांगितले की, पत्रकारांनी आयोजित केलेली मेजवानी म्हणजे कंटाळवाणा प्रकार आहे. खरे तर त्यांनी येथे असायला हवे होते. पुढील वर्षी मात्र मी व्हाइट हाऊस प्रतिनिधींच्या मेजवानीस उपस्थित राहणार आहे. पुढच्या वर्षी मेजवानीचा कार्यक्रम उत्कंठावर्धक असेल अशी आशा आहे पण तरी पुढील वर्षीही मी तुमच्यासाठी येथेही येईन.

ट्रम्प यांनी दी न्यूयॉर्क टाइम्स, दी वॉशिंग्टन पोस्ट यांच्यावर टीका केली. अध्यक्ष व वृत्तपत्रे- वृत्तसंस्था यांच्यातील वाद हा ट्रम्प प्रशासनाचे व्यवच्छेदक लक्षण बनला आहे. ट्रम्प यांनी मेजवानीस उपस्थित राहण्यास नकार देण्याआधीच अनेक माध्यम संस्थांनी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या वागणुकीच्या विरोधात या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही असे जाहीर केले होते. व्हॅनिटी फेअर व ब्लूमबर्ग हे या मेजवानीनंतर एक कार्यक्रम करीत असतात तो रद्द करण्यात आला. व्हाइट हाऊस प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष जेफ मॅसन यांनी अमेरिकी अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांवर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला त्यांनी सांगितले की, अध्यक्षांनी जे वक्तव्य आता व पूर्वी केले ते आम्ही विसरणार नाही. वृत्तपत्र स्वातंत्र्य हे लोकशाहीत महत्त्वाचे असते. पत्रकारांना खिजगणतीतही न ठेवणे हे अमेरिकेला घातक आहे.

ट्रम्प यांचे २० जानेवारी २०१७ पासूनच्या शंभर दिवसांतील महत्त्वाचे निर्णय

  • २० जानेवारी – डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून शपथविधी
  • २५ जानेवारी- मेक्सिको सीमेलगत भिंत उभारण्याच्या आदेशावर स्वाक्षरी
  • २७ जानेवारी- सात मुस्लीम देशांच्या लोकांना अमेरिकेत प्रवेश बंदी
  • ५ फेब्रुवारी- मुस्लीम प्रवेश बंदी जैसे थे ठेवण्याची न्यायालयाला विनंती
  • ११ फेब्रुवारी- उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी. जपानचे पंतप्रधान अॅबे यांच्याशी चर्चा
  • १३ फेब्रुवारी – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांचा राजीनामा
  • १६ फेब्रुवारी- पंचाहत्तर मिनिटांच्या पत्रकार परिषदेत माध्यमांवर खोटय़ा बातम्या देण्याचा आरोप
  • २७ फेब्रुवारी- लष्करी खर्चात १० टक्के वाढ
  • २८ फेब्रुवारी- अमेरिकी काँग्रेसमध्ये पहिले भाषण अनेक विषयांवर विवेचन
  • ४ मार्च- निवडणुकीत वायरटॅपिंगचा माजी अध्यक्ष ओबामांवर आरोप
  • ६ मार्च- इराक व अमेरिकी नागरिक सोडून इतर मुस्लिमांना प्रवेश बंदी, नवा आदेश जारी
  • १७ मार्च- नवीन स्थलांतर आदेशावर निकालाविरोधात अपील
  • २० मार्च- रशिया व ट्रम्प यांचे प्रचाराच्या वेळी संबंध एफबीआय चौकशीत उघड
  • २४ मार्च- ओबामाकेअर रद्द करण्यात अपयश
  • ५ एप्रिल- स्टीव्ह बॅनन यांना राष्ट्रीय सुरक्षा मंडळातून काढले
  • ६ एप्रिल- सीरियातील हवाई तळांवर टॉमहॉक क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आदेश
  • १२ एप्रिल- नाटोला विरोध मावळला
  • १९ एप्रिल- एच १ बी व्हिसा सुधारणा योजनेवर स्वाक्षरी
  • २२ एप्रिल- अफगाणिस्तानात बॉम्ब हल्ला १४० ठार.

ट्रम्प यांची नक्कल : भारतीय अमेरिकी हसन मिनहाज यांनी अध्यक्ष ट्रम्प यांची नक्कल केली. मिनहाज हे नकलाकारच आहेत. विनोद सहन होणार नाहीत म्हणून ते कदाचित पेनसिल्वानियात गेले असावेत. आमचे अध्यक्ष आमच्यात नसतात कारण ते नेहमीच मॉस्कोत असल्यासारखे आहेत अशी कोपरखळी त्यांनी मारली. मिनहाज हे उत्तर प्रदेशातील अलिगडचे आहेत.