दहशतवादी बुरहान वानीचा साथीदार सबजार अहमद भट्ट ऊर्फ अबू झरार याचा काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या धडक कारवाईत खात्मा करण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार बुरहान वानीच्या मृत्यूनंतर सबजार अहमद याला हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर बनवण्यात आले होते. भारतीय लष्कराने सुरू केलेल्या धडक कारवाईत काश्मीरमध्ये आतापर्यंत ८ दहशतवादी ठार झाले. यात सबजार अहमद याचा समावेश होता. लष्कराने श्रीनगरच्या ३६ किमी परिसरात शुक्रवारपासून शोध मोहिम सुरू केली आहे. या परिसरात मुजाहिद्दीनचे दहशतवादी दडल्याची माहिती समोर आल्यानंतर ही शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

बुरहान वानीचा साथीदार सबजार अहमद कोण होता? याची माहिती-

१. भारतीय सुरक्षा दलाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याला ठार करण्यात आल्यानंतर हिजबुलचे नेतृत्त्व सबजार भट्ट करत होता. सीएनएन न्यूज १८ च्या माहितीनुसार सबजार भट्ट ‘सब डॉन’ या नावाने ओळखला जात होता.

२. दक्षिण काश्मीरच्या त्राल येथील सबजार रहिवासी होती. बुरहान वानीचा उजवा हात म्हणून त्याची ओळख होती. तो बुरहानचा बालपणीचा मित्र असल्याचेही समजते. वानीचा मोठा भाऊ खालीदला ठार करण्यात आल्यानंतरच्या निषेधावेळी बंदुक हिसाकावून घेण्यात सबजारला यश आले होते. त्यानंतर सबजार हिजबुलमध्ये सामील झाला होता.

३. सबजार भट्ट याची काश्मीरमधील ‘ए ++’ दहशतवादी म्हणून ओळखला जात होता. त्राल परिसरात सबजारची दहशत निर्माण झाली होती. मुजाहिद्दीनने कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली, तरी बुरहाननंतर तोच संघटनेचा म्होरक्या म्हणून काम पाहात होता.

४. बुरहान वानीने याआधी ११ सहकाऱ्यांसोबतचा एक फोटो व्हायरल केला होता. यात सबजारचाही समावेश होता. फोटो व्हायरल झाल्यानंतर काश्मीरींकडून बुरहानला सहानुभूती मिळाली होती. हा फोटो व्हायरल करण्यामागचा मास्टरमाईंड सबजार भट्ट असल्याचे सांगितले जाते.

५. सबजार भट्टवर १० लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. वर्षाच्या सुरूवातीला एका चकमकीत सबजार जाळ्यात सापडला होता. पण चकमकीच्या दुसऱ्या दिवशी तो पळ काढण्यात यशस्वी झाला होता.