इबोला या रोगाचे आतापर्यंत जगात १०,००० रुग्ण सापडले असून त्यातील ४,९२२ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्येही एक रुग्ण सापडला असून त्यामुळे अमेरिका इबोलाशी लढण्यास सज्ज असल्याचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
इबोलाचा प्रसार पश्चिम आफ्रिकेतून सुरू झाला असून गीनिया, लायबेरिया व सिएरालोनमध्ये अनेकजण मरण पावले आहेत. माली येथे अलीकडेच एक लहान मुलगी इबोलाने दगावली. जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, २०१५ च्या मध्यावधीपर्यंत इबोलावर लस उपलब्ध करून दिली जाईल.
अमेरिकेत दोन परिचारिका इबोलातून बऱ्या झाल्या असून डल्लास येथील परिचारिका निना फॅम यांनी व्हाईट हाऊस येथे अध्यक्ष बराक ओबामा यांना आलिंगन देऊन आपण बरे झाल्याची साक्ष दिली. न्यूयॉर्क व न्यूजर्सीमध्ये काही रुग्णांना २१ दिवस वेगळे ठेवण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
न्यूयॉर्कमध्ये इबोलाचा रुग्ण सापडल्याने युरोपमधील शेअरबाजार शुक्रवारी कोसळला. न्यूयॉर्कच्या एका डॉक्टरला गीनिया येथे उपचार करताना इबोलाची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहायक महासंचालक मारी पॉल किनी यांनी सांगितले की, २०१५ पर्यंत इबोलावर लस उपलब्ध करून दिली जाईल.
चाचण्यांना सुरुवात
तज्ज्ञांची सगळी भिस्त आरव्हीएसव्ही लशीवर असून तिचे डोसेस जीनिव्हात आले आहेत व त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. ब्रिटनच्या ग्लॅक्सोस्मिथक्लाइनने सीएचएडी ३ ही लस उपलब्ध केली असून त्याच्याही चाचण्या सुरू आहेत. इतर पाच लशीही चाचण्यांसाठी तयार आहेत असे सांगण्यात आले.