देशातील मंत्री वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात जाऊ शकतात, तर मग भारतीय जवानांना का नेले जात नाही, असा उद्विग्न सवाल पाकिस्तानच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या भारतीय जवानाच्या बहिणीने उपस्थित केला आहे.  सध्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रकार सुरू आहेत. जम्मू काश्मीरच्या हिरानगर सेक्टरमधील बोबिया या बीएसएफच्या (सीमा सुरक्षा दल) चौकीवर शुक्रवारी पाककडून गोळीबार करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. जवळपास ४० मिनिटे पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता. यावेळी बीएसएफचा गुरनाम सिंह हा जवान जखमी झाला होता. नंतर पुन्हा दुपारी १२.१५ च्या सुमारास पाकिस्तानने गोळीबार सुरू केला. कथुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमधील बोबीयान भागात पाकिस्तानने जोरदार गोळीबार केला. यानंतर भारताने पाकिस्तानी सैन्याला जशास तसे उत्तर दिले. यामध्ये ७ पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले होते.
गुरनाम सिंहची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यामुळे गुरनामला उपचारांसाठी परदेशात हलविण्यात यावे, अशी मागणी त्याची बहीण गुरूजित कौर हिने केली आहे. आपल्या देशातील मंत्री उपचारासाठी परदेशात जाऊ शकत असतील तर सैनिक का नाही, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. हे शक्य नसेल तर निदान परदेशी डॉक्टरांचे पथक बोलवण्यात यावे, असे गुरूजितने म्हटले आहे. आम्हाला गुरूनामच्या पकृतीविषयी चिंता वाटत आहे, असे गुरूजितने म्हटले.
दरम्यान, शनिवारी सकाळी जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. बोधराज असे गुप्तहेराचे नाव असून त्याच्याकडून दोन पाकिस्तानी सिम कार्ड आणि सुरक्षा दलाच्या बंदोबस्तासंदर्भातील नकाशे जप्त करण्यात आले आहेत.