अमेरिकेतल्या कॅन्सस शहरात वंशद्वेषी भावनेतून खून झालेल्या भारतीय इंजिनिअरच्या पत्नीने हा खडा सवाल डोनाल्ड ट्रम्पच्या अमेरिकन सरकारला विचारला आहे.

बुधवारी रात्री एका अमेरिकन माणसाने श्रीनिवास कुचिभोतला या ३२ वर्षांच्या भारतीय इंजिनिअरचा खून केला होता. त्याआधी या अमेरिकन माणसाने श्रीनिवासला ‘माझ्या देशातून चालता हो’ असं हिणकसपणे सुनावलं होतं.

श्रीनिवासची बायको सुनयना दुमलाने पत्रकार परिषद घेत माझ्या पतीचा आणि बाकी अनेकांचा वर्णभेदातून खून का करण्यात आला याचं उत्तर मला हवं अाहे असं ट्रम्पला खडसावलंय.

सुनयना दुमलाची संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी खालच्या व्हिडिओवर क्लिक करा

सौजन्य- फेसबुक

मुक्त विचारांची भूमी म्हणवणाऱ्या अमेरिकेत वर्णद्वेषी आणि वंशद्वेषी भावना याआधीही मोठ्या प्रमाणात होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रं त्यांच्या हातात घेतल्यावर तिथे एक उन्मादाचं वातावरण तयार झालं आहे. आतापर्यंत काहीशी दबलेली ही वर्णभेदी मानसिकता पुन्हा एकदा उफाळून वर येताना दिसतेय.

श्रीनिवासला अॅडम प्यूरिंटन या अमेरिकन माणसाने गोळ्या घालून ठार केलं. याआधी ‘गेट आऊट आॅफ माय कंट्री’ असं तो जोरात ओरडला होता. ९ नोव्हेंबर २०१६ च्या मतमोजणीत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष होणार हे निश्चित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे वाक्य अमेरिकेत अनेक कृष्णवर्णीय, आशियाई आणि दक्षिण अमेरिकन नागरिकांना सुनावलं गेलं होतं. आणि हे कोणी जाहीर सभा घेत म्हटलं नव्हतं तर अमेरिकेच्या अनेक शहरांमधल्या रस्त्यारस्त्यावर सामान्य गौरवर्णीय नागरिकांनी गोऱ्या नसलेल्या अमेरिकन नागरिकांना असे टोमणे दिले. यावरूनच कळतं की हा नव्याने निर्माण झालेला उन्माद किती सर्वदूर पसरला आहे.

आता श्रीनिवासचा हकनाक बळी गेल्यानंतर हाच मुद्दा आता ठळकपणे समोर आला आहे.