एखाद्या व्यक्तीने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला तर त्यास पहिल्या पत्नीच्या मंजुरीची गरज नाही, असा अजब सल्ला पाकिस्तानच्या घटनात्मक परिषदेने सरकारला धार्मिक मुद्दय़ांवर दिला. घटनात्मक मंडळानेच सरकारला दिलेल्या या अजब सल्ल्याचे तीव्र पडसाद समाज माध्यमांवर उमटू लागले आहेत.
मुस्लीम विचारसरणीच्या सीआयआय या मंडळाने स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीने पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न करण्याबाबतचा पाकिस्तानी कायदा हा धार्मिक सिद्धांताच्या विरोधात आहे. शरिया या धार्मिक कायद्यानुसार पुरुषाला एकापेक्षा अधिक लग्ने करण्याचा अधिकार असून सरकारने पाकिस्तानी कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी परिषदेचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद खान शीरानी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
काही प्रमाणात दुमत ?
इस्लामाबाद येथे परिषदेच्या सदस्यांनी भेटून विद्यमान पाकिस्तानी कुटुंब कायद्याबाबत चर्चा केली. शीरानी यांनी सांगितले की, मुस्लीम शरिया कायद्यानुसार पुरुषाला दुसरे लग्न करताना आपल्या बायकोला विचारण्याची गरज नाही, तर मुस्लीम कुटुंब कायदा १९६१ नुसार पुरुषाने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला तर त्याला आधीच्या पत्नीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे.
दरम्यान, धार्मिक संस्थेच्या अशा प्रकारच्या सल्ल्याचे तीव्र पडसाद समाज माध्यमांमध्ये उमटू लागले आहेत. ऑस्कर विजेते पाकिस्तानी लघुपटकार शरमीन ओबैद चिनॉय, पाकिस्तानी अभ्यासक झहिद हुसैन, सामाजिक कार्यकर्त्यां निलोफर अफ्रिदी काजी यांनी ट्विटरवर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत देशात महिलांना योग्य स्थान नसल्याची टीका केली आहे