एका छायाचित्रकाराचा कॅमेरा हिसकावून घेऊन त्याच्याशी खेळणाऱ्या माकडाने अनाहूतपणे एक बटण दाबले आणि आश्चर्यकारकपणे अगदी ठरवून काढल्यासारखा ‘सेल्फी’ फोटो काढला गेला. ही घटना २०११ मधील. या छायाचित्रकाराने हा फोटो इंटरनेट जाळ्यावर टाकताच वणव्यासारखा तो जगभरात पोहोचला. मात्र ‘विकीमीडिया फाऊंडेशन’ने तो नुकताच आपल्या संकेतस्थळावर ठेवल्याने एक मोठेच वादंग निर्माण झाले आहे. या फोटोचा कॉपीराइट आपला असल्याचा दावा छायाचित्रकाराने केला आहे, तर विकीमीडियाने तो फेटाळून लावत संकेतस्थळावरून हा फोटो काढण्यास सपशेल नकार दिला आहे.
डेव्हिड स्लेटर हा ब्रिटिश छायाचित्रकार डच संशोधकांबरोबर इंडोनेशियात गेला असताना २०११ मध्ये हा प्रसंग घडला होता. त्याने हा फोटो इंटरनेटवर टाकल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धीही मिळाली होती. मात्र तोच फोटो आता विकीमीडियाने मोफत डाऊनलोड करण्यासाठी ठेवला आहे. या फोटोचा कॉपीराइट आपला असल्याचा दावा करीत स्लेटरने विकीमीडियावर ३० हजार डॉलर नुकसानभरपाईचा दावा लावण्याचा इशारा दिला आहे.