दिल्लीत २०१२ साली झालेल्या सामूहिक बलात्काराप्रकरणातील आरोपी मुकेश सिंहची मुलाखत घेण्याची परवानगी कशाप्रकारे देण्यात आली, याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी संसदेत दिले. निर्भया वृत्तपटाच्या प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. याप्रकरणी माहिती देताना राजनाथ यांनी आपण माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून जगभरात या वृत्तपटाचे प्रसारण थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ८ मार्च रोजी महिला दिनी प्रसारित होणाऱ्या या वृत्तपटाचे प्रसारण थांबविण्यासाठी सरकारने न्यायालयाकडून आदेशही मिळवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

बीबीसी या वाहिनीसाठी काम करणारे लेस्ले उडविन यांनी तिहार तुरूंगामध्ये निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीदरम्यान, मुकेश सिंगने अनेक आक्षेपार्ह आणि मानहानीकारक वक्तव्ये केली होती. सामूहिक बलात्काराचा बळी ठरलेल्या ‘निर्भया’ व तिच्या मित्रानेच अमानुषता दाखवल्याचा खळबळजनक दावा मुकेशने केला होता. निर्भया व तिचा मित्र यांनी विरोध केला नसता, तर आमच्या टोळीने अमानुष मारहाण करून तिला ठार केले नसते, असे मुकेश सिंहने या मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर याप्रकरणावरून समाजाच्या सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली. त्यामुळे न्यायालयाने या सगळ्याची दखल घेत संबंधित वृत्तपटाच्या प्रसारणावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले.
या वृत्तपटाचे निर्माते लेस्ले उडविन हे अॅकेडमी अॅवॉर्डस या प्रतिष्ठित पुरस्काराचे विजेते आहेत. त्यांनी निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंहची मुलाखत घेऊन बीबीसीसाठी ‘इंडियाज डॉटर’ हा वृत्तपट तयार केला होता. चार तासांच्या या वृत्तपटात पिडीत मुलीचे कुटुंबिय, आरोपी आणि त्यांचे कुटुंबिय आणि काही वकिलांच्या विस्तृत मुलाखतींचा समावेश आहे.
मात्र, याप्रकरणी विरोधकांनी संसदेत काहूर निर्माण केले. तिहार तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीची अशाप्रकारे मुलाखत घेण्याची परवानगी सरकार देऊच कशी शकते, असा सवाल काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी उपस्थित केला. तर, समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनीही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत याप्रश्नी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. गेल्या तीन वर्षांपासून मला शांत बसविण्यात आले. मात्र, सरकार निर्भयाच्या स्मृतींचे रक्षण करण्यासाठी काय करत आहे, याचे उत्तर मला आता हवे असल्याचे त्यांनी म्हटले.

..तर ‘निर्भया’ ला मारले नसते