राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना योग्यवेळी उत्तर देऊ, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे. नितीश कुमार यांनी महाआघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर लालूप्रसाद यादव आणि राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. यावर भाष्य करताना ‘लालूप्रसाद आणि राहुल गांधी यांच्या आरोपांना योग्यवेळी प्रत्युत्तर देण्यात येईल,’ असे नितीश कुमार यांनी म्हटले.

भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय राज्याच्या हिताचा विचार करुन घेतल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले. नितीश कुमार यांनी बुधवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. ‘नितीश कुमार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. खुद्द नितीश यांनीच याबद्दलची माहिती निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. खुनाचे प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठीच त्यांनी भाजपशी सेटिंग केली,’ असा हल्लाबोल लालूप्रसाद यादव यांनी केला होता. यावर बोलताना लालूप्रसाद यादव यांच्या सर्व आरोपांना योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली.

सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर राज्याच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले. ‘बिहारच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. बिहारच्या जनतेचा विचार करुनच भाजपशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून राज्याच्या सेवेसाठी मी कायम तत्पर असेन,’ असे नितीश कुमार यांनी म्हटले. नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला होता. ‘तेजस्वी यादव यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे नव्हे, तर स्वत: विरोधात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यामुळे नितीश यांनी राजीनामा दिला,’ असा गंभीर आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीदेखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘आपल्या स्वार्थी राजकारणासाठी नितीश कुमार यांनी जातीयवादी विचारधारा असलेल्या पक्षांशी युती केली,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी नितीश यांच्यावर शरसंधान साधले. ‘नितीश यांनी जातीयवादी पक्षाशी लढा देण्यासाठी आमच्यासोबत हातमिळवणी केली होती. मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी ज्यांच्याविरोधात लढा दिला, त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन केले,’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली.