चीनची भूमिका

आण्विक पुरवठादार गटातील (एनसजी) भारताच्या प्रवेशाला चीन विरोध करीत असला, तरी त्याचा दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर काही परिणाम होणार नाही, असे चीनने म्हटले आहे.

चीन व भारताच्या द्विपक्षीय संबंधांनी ‘योग्य गती’ राखली असून, एनएसजीतील भारताच्या प्रवेशाच्या मुद्दय़ाचा त्याच्याशी काही संबंध नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीच्या पाश्र्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले.

भारत व चीन यांच्या द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीबाबत आम्ही नेहमी सकारात्मक टिप्पणी केली आहे. दोन्ही उदयोन्मुख बाजारपेठा असून आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे, असे हुआ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. घट्ट वीण असलेले नातेसंबंध विकसित करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याबाबत आमचे एकमत झालेले आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.

भारताला एनएसजीचे सदस्यत्व मिळण्याच्या मुद्दय़ावर दोन्ही देशांमधील मतभेदांचा दोघांच्या संबंधांवर परिणाम होईल काय, असे विचारले असता हुआ म्हणाल्या की, या मुद्दय़ावर आम्ही आमची भूमिका विशद केली आहे. नव्या सदस्यांच्या या गटात प्रवेशाबाबतचा निर्णय गटातील सदस्यांच्या चर्चेतूनच घेतला जाईल असे आमचे मत आहे.

ज्या देशांनी परमाणू प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केलेली नाही, अशा देशांना एनएसजीचे सदस्यत्व देण्याबाबत ४८ सदस्यांच्या या गटात एकमत असावे, असे चीन सांगत आला आहे. एनएसजीच्या सदस्यत्वासाठी अर्ज करणाऱ्या भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी एनपीटीवर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. भारतासाठी अमेरिका जोमाने प्रयत्न करत आहे, तर चीन पाकिस्तानची बाजू रेटून धरत आहे.

एनएसजीमध्ये भारताच्या प्रवेशाला असलेला विरोध चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी जारीच ठेवला आहे. एनएसजीमध्ये शिरकाव करण्याचा भारताचा प्रयत्न त्याच्या अण्वस्त्रसज्ज दर्जाला वैध रूप देण्याच्या उद्देशाने आहे, अशा आशयाचा लेख चीनच्या ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडीज’च्या अण्वस्त्रबंदी कार्यक्रमाच्या संचालकांनी ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये लिहिला आहे.