जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या ‘दंगल’ गर्ल झायरा वसिमला संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर सरकारने शिफारस केल्यास झायराला संरक्षण पुरवले जाईल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री  किरेन रिजीजू यांनी दिली आहे.

जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची बालकलाकार झायरा वसिमने भेट घेतली होती. या भेटीवरुन झायरावर सोशल मीडियावरुन टीका सुरु झाली होती. फुटिरतावाद्यांनीही तिला धमकी दिल्याने झायराने फेसबुवर माफिनामाच टाकला होता. झायराने शेअर केलेल्या या पोस्टनंतर अनेक जण तिच्या समर्थनार्थ मैदानात उतरले होते. गीता फोगट आणि बबिता फोगटपासून ते जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यापर्यंत सर्वांनी तिला पाठिंबा दिला होता. तर मंगळवारी आमिर खाननेही तिला पाठिंबा दर्शवला होता.

जम्मू काश्मीरमधून येणा-या झायराला धमकी आल्याने तिला पोलीस संरक्षण देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अंतर्गत येत नाही. आम्हाला जम्मू काश्मीर सरकारने शिफारस केल्यावर तिला संरक्षण पुरवले जाईल असे रिजीजू यांनी सांगितले. बिहार पोलिसांनी कानपूर अपघातामागे पाकचा हात असल्याचा दावा केला आहे. यावरही रिजीजू यांनी प्रतिक्रिया दिली. रिजीजू म्हणाले, प्रकरणाची सविस्तर चौकशी केल्यावर यावर भाष्य करता येईल.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. जम्मू काश्मीर सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गरज वाटल्यास तिला संरक्षण पुरवले जाईल असे त्यांनी म्हटले होते. सिंह म्हणाले, समाजाने तरुणांमधील कलागुणांचा सन्मान केला पाहिजे. विशेषतः जम्मू काश्मीरसारख्या दहशतवादग्रस्त राज्यातून येणा-या कलाकारांचे तर कौतुकच केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.