बिहारमध्ये गेल्या काही तासांमध्ये घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर संयुक्त जनता दलाने (जदयू) केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देऊ केला आहे. जदयूचे प्रवक्ते के.सी. त्यागी यासंदर्भातील माहिती दिली. येत्या १५ ऑगस्टनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे फेरबदल ठरतील. त्यामुळे यावेळी मंत्रिमंडळात कोणत्या नव्या नेत्यांची वर्णी लागणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान, काल नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) फारकत घेतली होती. त्यानंतर आज नितीशकुमार यांनी आज राजभवनात पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार हे सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. बिहारमधील या बदललेल्या सत्ता समीकरणाचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही झाला आहे. नितीश यांच्या संयुक्त जनता दलाने लोकसभा आणि राज्यसभेत मोदी सरकारला पाठिंबा देऊ केल्याने आता केंद्रात ‘एनडीए’चे संख्याबळ वाढणार आहे. तर दुसरीकडे आगामी मंत्रिमंडळ फेरबदलाच्यावेळी जदयूला सत्तेत सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता आहे. जदयूच्या के.सी. त्यागी यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तत्पूर्वी राजद आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी नितीश यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली. नितीशकुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला संधी दिली गेली नाही. भाजपचा लोकशाहीवर याआधी कधीच विश्वास नव्हता आणि आजही नाही. भाजपच्या या कृत्याचा धिक्कार करतो, अशा शब्दांत दिग्विजय यांनी संताप व्यक्त केला. तर राहुल गांधी यांनी म्हटले की, नितीश यांनी बिहारमधील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यापूर्वी नितीश मला भेटले होते. मात्र, तेव्हा त्यांनी या निर्णयाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता. मात्र, तरीही गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला नितीश कुमार असे काहीतरी करणार, याची कुणकुण होतीच, असे राहुल यांनी सांगितले. बिहारच्या जनतेने जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी नितीश कुमार यांना मते दिली होती. मात्र, वैयक्तिक राजकारणासाठी नितीश यांनी त्याच शक्तींशी हातमिळवणी केली , अशी टीका राहुल गांधींनी केली.