भारताच्या हद्दीत बेकायदा हवाई घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. चीन लगतच्या सीमारेषेवर भारताने ‘आकाश’ क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी चिनी हवाई घुसखोरी रोखण्यासाठी ‘सुखोई-३० एमकेआय’ या लढाऊ विमानांचा ताफा सीमेवर कोणत्याही क्षणी युद्धात उतरण्यास सज्ज अशा स्वरूपात ठेवण्यास सुरूवात केली होती. आता त्यात आकाश क्षेपणास्त्रांचाही भर पडणार आहे.
भारत-चीन दरम्यान ४,०५७ किलोमीटर लांबीची सीमा आहे. त्यातील तेजपूर व चबुआ येथील विमानतळांवर देशाची सध्याची सर्वांत प्रभावशाली लढाऊ विमाने असलेल्या सुखोई विमानांची तुकडीही तैनात केली गेली आहे. चीनच्या कोणत्याही प्रकारचे विमान, हेलिकॉप्टर किंवा मानवविरहीत विमानाला दिसताचक्षणी पाडण्यासाठी आकाश क्षेपणास्त्र तयार ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आकाश क्षेपणास्त्रे कोणत्याही स्वरुपाच्या हवामानामध्ये २५ किमी अंतरावरील लक्ष्यभेद करु शकत असल्याची माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. केंद्रीय संरक्षणविषयक समितीने परवानगी दिल्यानंतर या भागामध्ये ही क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येत आहेत.