सुब्रमण्यम स्वामी यांची टीकाकारांना धमकी; भाजपमध्ये नाराजी

‘मी शिस्तीची उपेक्षा केली तर रक्ताचा सडा पडेल,’ अशा शब्दांत आपल्याला संयम पाळण्यास सांगणाऱ्यांना भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी धमकी दिली. दरम्यान, स्वामी यांच्या वक्तव्याबाबत भाजपचे नेतृत्व नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मी अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर टीका करत असताना लोक मला शिस्त आणि संयम पाळण्याचा आगाऊपणे सल्ला देत आहेत. पण मी शिस्त पाळली नाही तर रक्ताचा सडा पडेल याची या लोकांना जाणीव नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवणारे ट्वीट स्वामी यांनी केले.स्वामी यांनी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर बुधवारी शाब्दिक हल्ला चढवला होता, तसेच गुरुवारी आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांच्यावर टीका केली होती. या संदर्भात जेटली यांनी स्वामी यांना संयम व शिस्त पाळण्याचा सल्ला दिल्यामुळे स्वामी यांनी नाव न घेताही जेटली यांना लक्ष्य बनवल्याचे स्पष्ट आहे.

भाजप नेतृत्व नाराज

सुब्रमण्यम स्वामी यांचे अर्थमंत्री अरुण जेटली व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवरील उघड हल्ल्यांबाबत भाजपचे नेतृत्व नाराज असून त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे कळते.

अर्थ मंत्रालयाला लक्ष्य करून स्वामी यांची बेलगाम टीका आणि ‘रक्तपात’ करण्याबाबत त्यांनी दिलेली धमकी याबद्दल पक्षात चिंता व्यक्त होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वामींविरुद्ध काही कारवाई न करता ‘थांबा आणि वाट पाहा’ असे धोरण पक्षाने स्वीकारले असल्याची माहिती त्यांनी दिली.