बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा व त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा तेथील नेत्यांपुढे उपस्थित करावा अशी मागणी बांगलादेशातील हिंदू संघटनांनी केली आहे.

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्य असून बांगलादेशातील मूलतत्त्ववादी त्यांच्यावर हल्ले करीत आहेत. जमाते इस्लामीचे अतिरेकी तेथील हिंदूंना नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत भारत हा हिंदूबहुल शेजारी देश असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हिंदूच्या  हिंसाचाराविरोधात पावले टाकण्यास बांगलादेश सरकारला सांगावे, हिंदूंच्या सुरक्षा व संरक्षणाची हमी प्राप्त करून द्यावी असे बांगलादेश हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी कौन्सिलचे सरचिटणीस व मानवी हक्क कार्यकर्ते राणा दासगुप्ता यांनी म्हटले आहे. बांगलादेशात अलीकडेच पबना येथे नित्यरंजन पांडे या हिंदूू आश्रमातील सेवकाचा खून झाला. अल्पसंख्याक समाजातील चार जणांची हत्या आतापर्यंत झाली आहे. धार्मिकबहुल व मूलतत्त्ववादी हे गेले दोन वर्षे हिंदूंना त्या देशातून नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. बांगलादेश हे मूलतत्त्ववादी राष्ट्र बनले आहे. भारतात स्थिरता हवी असेल तर अल्पसंख्याकांना संपवण्याचे हे प्रयत्न थांबले पाहिजेत असे दासगुप्ता यांनी म्हटले आहे. अलीकडेच एका हिंदू धर्मगुरूचीही हत्या करण्यात आली होती, तसेच राजशाही येथे उदारमतवादी प्राध्यापकाला तसेच समलिंगीविषयक मासिकाच्या संपादकाला ठार करण्यात आले होते.

बांगलादेश फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक पीयूष बंडोपाध्याय यांनी सांगितले की, भारताने बांगालदेशवर दडपण आणल्याशिवाय मूलतत्त्ववादी माघार घेणार नाहीत. येथे हिंदूंची अवस्था भयानक आहे. अवामी लीगचे धर्मनिरेपक्ष सरकार असले तरी स्थिती वाईट आहे. हिंदू महिलांवर बलात्कार, मालमत्तेची लूट, नासधूस असे प्रकार चालू आहेत.