बलात्कार ‘इंडिया’त होतात भारतात नव्हे, या वक्तव्याने गदारोळ उडवून देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आता लग्नकरारानुसार स्त्रीने घराचा उंबरठा ओलांडू नये आणि नवऱ्याने बाहेरकाम करावे, असा नवा सल्ला देऊन पुन्हा वादाला तोंड फोडले आहे.
इंदूरमध्ये कार्यकर्त्यांसमोर शनिवारी बोलताना भागवत यांनी विवाहाच्या कराराचा दाखला दिला. ते म्हणाले, लग्नकरारात पती आणि पत्नी एकमेकांना काही हमी देतात. तू माझ्या घराची काळजी घे आणि मी तुझ्या गरजा पूर्ण करीन, तुझे संरक्षण करीन, अशी हमी नवरा देतो. मग जोवर पत्नीही करार पाळते तोवर तो तिच्यासह राहातो आणि जर तिने करारभंग केला तर तो तिचा त्याग करू शकतो, अशी मुक्ताफळे भागवत यांनी उधळली आहेत.
मार्क्‍सवादी नेत्या वृंदा करात यांनी खरमरीत भाषेत टीका करीत सांगितले की, या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटत नाही.
संघाचे खरे स्वरूपच त्यातून उघड होते. त्यांना पुन्हा मनुस्मृती देशात लागू करायची आहे. महिलांना दुय्यम मानणारी आणि त्यांना पुरुषांची दासी मानणारी ही प्रवृत्ती आहे.संघप्रवक्ते राम माधव यांनी भागवत यांच्या विधानांचा पूर्णपणे चुकीचा अर्थ लावला गेल्याचा दावा केला आहे. पाश्चात्य देशांत लग्नाला करार मानले जाते तर आपण त्याला पवित्र बंधन मानतो. येथे संपूर्ण कुटुंबाची पतीवर काहीतरी जबाबदारी आहे, याचे भान भागवत देत होते.