येथे एका ३० वर्षांच्या महिलेचा उमरवाडा येथे एका व्यक्तीने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात मृत्यू झाला. तिची दोन मुले गंभीर भाजली आहेत. सदर व्यक्ती व त्याच्या दोन साथीदारांनी तिच्याशी लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला म्हणून त्यांनी तिच्यावर अ‍ॅसिड फेकले त्यात ती मरण पावली.
गुरुवारी रात्री ही घटना घडली. आरोपी अस्लम शेख याने व त्याच्या मित्रांनी महिलेच्या घरात घुसून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला तिने विरोध करताच त्यांनी तिच्यावर व मुलांवर अ‍ॅसिड फेकले, असे सहायक पोलीस आयुक्त नरेश कंझारिया यांनी सांगितले.
मरण पावलेल्या महिलेचे नाव हेमू राठोड असे असून तिला सरकारी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. राज (११) व प्रेम (९) ही दोन मुले गंभीर भाजली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेख व त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींना अटक
पोलिसांनी अस्लम शेख व राजा विमलनारायण शेखर व सर्फराझ शेख यांना  कोईली खाडी भागात अटक केली. महिलेचा पती रामू राठोड (३०) व सासू कौशल्या राठोड  (४८) किरकोळ भाजले आहेत.
हेमूच्या पतीने सांगितले की, अस्लम हा त्याच्या पत्नीला छळत असे व तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता. रामूने अस्लमचे वडील सलीम शेख यांच्याकडे तक्रार केली असता आरोपीला राग आला म्हणून त्याने हे कृत्य केले असे कंझारिया यांनी सांगितले. पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.