राजधानी दिल्लीमध्ये महिलांना सुरक्षितता वाटत नाही… ही प्रतिक्रिया आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची. 
दिल्लीतील लाजपतनगर भागात एका २६ वर्षांच्या मुलीवर मंगळवारी बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुलीच्या तोंडात लोखंडी गज घालून तिला जखमी करण्यात आले. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यापार्श्वभूमीवर शीला दीक्षित यांनी पोलिसांची खरडपट्टी काढली.
महिलांना दिल्लीत अजिबात सुरक्षित वाटत नाही. काल लाजपतनगरमध्ये घडलेली घटना धक्कादायक आहे. त्यामुळे आमच्या काळजीत आणखी भर पडली आहे, असे दीक्षित यांनी म्हंटले आहे.
संबंधित मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱयाला पोलिसांनी अटक केली. त्या मुलीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी दिल्ली सरकारने अनेक उपाय योजले आहेत. जेव्हा आपण सुरक्षिततेचा विचार करतो, त्यावेळी आपल्याला माहिती असते की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस उपलब्ध आहेत. मात्र, पोलिसांबद्दल सध्या अजिबात समाधानकारक वातावरण नाही, असे दीक्षित यांनी म्हटले आहे.