गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला मदत करणारे गोध्रा मतदारसंघातील काँग्रेस आमदार सी. के. राऊलजी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. भाजपला मदत केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या आमदारकीला कोणताही धोका नाही. मी सुरूवातीला ‘जदयू’मध्ये होतो. तेव्हादेखील मी निवडणुकीत विजय मिळवला होता. माझ्या कार्यकाळात मी मतदारसंघाच्या विकासासाठी खूप मेहनत घेतलीये. येथील मतदारांशीही माझा चांगला संपर्क आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अल्पसंख्यक समाजाची मते मिळाली नाहीत, तरी माझ्या आमदारकीला कोणताही धोका नाही, असा ठाम विश्वास राऊलजी यांनी व्यक्त केला. सी.के.राऊल गोध्रा मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांच्याविरोधात बंडखोरी केल्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याबद्दल विचारले असता, मी अजूनही पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी म्हटले. सध्या मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भविष्यात पक्ष काय निर्णय घेईल, ते पाहू, असे सांगत राऊलजी यांनी या विषयावर अधिक बोलायचे टाळले.

दरम्यान, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जीतू वघानी यांनी मुस्लिम समाज भाजपच्याच बाजूने असल्याचा दावा केला आहे. तुम्ही उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल पाहा किंवा तालुका, नगरपालिका आणि पंचायत निवडणुकीच्या निकालांवर नजर टाका. प्रत्येक मतदाराने जातीपातीचा विचार न करता भाजपला मतं दिली आहेत. भाजपसोबत राहिल्यास विकास होईल, याची जाणीव मुस्लिमांना आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गुजरात राज्यसभा निवडणुकीप्रकरणी गुजरात हायकोर्टाने सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावाली. २१ सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यावे असे निर्देश हायकोर्टाने या सर्वांना दिले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या उमेदवाराने दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने नोटीस बजावली.

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बलवंतसिंह राजपूत यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला होता. भाजपने निवडणुकीत काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याविरोधात राजपूत यांना उमेदवारी दिली होती. नाट्यमय घडामोडींनी निवडणुकीत रंगत आली आणि पटेल यांनी विजय मिळवला. अमित शहांना धक्का देत काँग्रेसने प्रतिष्ठा कायम राखली. या निवडणुकीत शंकरसिंह वाघेला यांचे कट्टर समर्थक असलेले भोलासिंह गोहिल आणि राघवभाई पटेल या काँग्रेस आमदारांनी भाजपला मतदान केले. त्यांनी मतपत्रिका भाजपच्या निवडणूक प्रतिनिधींना उघड उघड दाखवली. काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आणि शेवटी निवडणूक आयोगाने या दोघांना अपात्र ठरवले होते.