जगभरातील कोटय़वधी कानसेनांना उत्तमोत्तम गाण्यांच्या रेकॉर्डस पुरविणाऱ्या एचएमव्ही या कंपनीपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. गाणी डाऊनलोड करून घेण्याच्या तंत्रज्ञानाचा मोठा फटका बसल्याने ही कंपनी सध्या आर्थिक गटांगळ्या खात आहे. दोन प्रमुख बँकांनी यापुढे कर्ज देण्यास नकार दिल्यास सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची आफत या नामांकित कंपनीवर आली आहे.
येथील हाय स्ट्रीटवर १९२१पासून कानसेनांच्या दिमतीला असणाऱ्या या रेकॉर्ड कंपनीला डाऊनलोड तंत्रज्ञानाचा फटका बसला आहे. रेकॉर्ड विकत घेण्यापेक्षा अ‍ॅमेझॉन आणि आयटय़ून्ससारख्या साइट्सवरून गाणी डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढल्याने एचएमव्हीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कंपनीचे अस्तित्व टिकविण्यासाठी रॉयल बँक आणि लॉइड बँक या दोन मोठय़ा बँकांकडून एचएमव्हीने भरमसाट कर्ज घेतले आहे, एचएमव्हीचा कोसळता डोलारा पाहाता या बँकांनी भविष्यात आणखी कर्ज देण्यास असमर्थता दर्शविल्याने एचएमव्हीसमोर कामगारकपातीचा अंतिम उपाय उरला आहे. आर्थिक गणित जुळविण्यासाठी एचएमव्हीला आपल्या चारशे कामगारांना कमी करावे लागणार आहे. परिणामी या कंपनीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.