डोकलाम वादावरून भारत-चीनमध्ये संबंध ताणले गेले आहेत. वेळोवेळी धमक्यांचे तुणतुणे वाजवणाऱ्या चीनने आता नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसते. डोकलाम वादानंतर दोन्ही देश परस्परांमधील संबंध सुधारावेत यासाठी एकत्र आले आहेत. दोन्ही देश एकत्रित काम करून द्विपक्षीय संबंधांना एका नव्या उंचीवर नेऊ शकतील, असे चीनने म्हटले आहे.

पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्त कोलकातामध्ये आयोजित कार्यक्रमाला चीनचे कौन्सिल जनरल मा झनावू आले होते. भारत आणि चीन एकत्रित काम करत आहेत. डोकलाम वादानंतर दोन्ही देश द्विपक्षीय सुधारण्यासाठी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची ५ सप्टेंबरला भेट झाली होती. त्यावेळी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत चर्चा झाली होती, असेही झनावू यांनी सांगितले.

डोकलाम वाद मागे सोडला आहे का, असा प्रश्न त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर डोकलाम वाद मागे सोडून आम्ही पुढे आलो आहोत. दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. उभयंतांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने आम्ही पाऊल टाकले आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यातील भेटीचाही त्यांनी उल्लेख केला. या भेटीत द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

डोकलामसारख्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्याची गरजही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यावर एकमतही झाले होते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जूनमध्ये डोकलाम परिसरात भारत आणि चीनचे जवान आमनेसामने आले होते. चीनद्वारे तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याला भारतीय जवानांनी विरोध केला होता. डोकलाम परिसरात भारतीय लष्कराने जवान तैनात केले होते. त्यानंतर भारत आणि चीनमधील वाद मिटला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने २८ ऑगस्टला सांगितले होते. या घोषणेनंतर दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेतले होते.