जागतिक बँकेने भारतातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणासाठी २५ कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे. यामध्ये युवकांना कुशल बनवणे आणि यातून त्यांना रोजगार मिळवणे सुलभ होईल या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. कौशल भारत मिशन अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. भारत सरकारच्या युवकांना अधिक कुशल बनवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यास आम्ही इच्छुक असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. या माध्यमातून युवा भारताची आर्थिक वाढ आणि समृद्धीत आणखी योगदान देता येईल, असे बँकेने म्हटले आहे. २५ कोटी डॉलर कर्जाला बँकेच्या कार्यकारी संचालकांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे पत्रकात सांगण्यात आले आहे.

या कार्यक्रमातंर्गत १५ ते ५९ वर्षांच्या बेरोजगारांना किंवा अनुकूल रोजगारापासून वंचित लोकांना कौशल प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये १.२ कोटी १५ ते २९ वर्षांच्या युवकांचाही समावेश आहे. या कार्यक्रमातंर्गत महिलांना रोजगार आणि उद्यमशीलतेची संध उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर त्यांनाही कौशल विकासाचा लाभ मिळवता येईल.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील एका थिंक टँकनेही भारताला मदत करण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. कौशल विकास सुधारणेसाठी भारताची मदत आपण करू शकतो पण त्यांना सध्याच्या प्रशिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल करण्याची गरज असल्याचे ऑस्ट्रेलियाने म्हटले होते. त्याचबरोबर अशा योजनांकडे भारताच्या दीर्घकालीन आर्थिक रणनीतीच्या स्वरूपात पाहिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते. स्किल इंडिया ही भारत सराकरची एक मोठी योजना आहे. याअंतर्गत वर्ष २०२२ पर्यंत ४० कोटी भारतीय व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे, असे मेलबर्न येथील थिंक टँक ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिटयूटने (एआयआय) म्हटले आहे.