भारत स्वत:चे संरक्षण स्वत: करु शकतो आणि हे भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करुन जगाला दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत बोलताना म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा विशेष उल्लेख करत भारतीय लष्कराचे सामर्थ्य अधोरेखित केले. ‘भारतीय लष्कराने सीमारेषा ओलांडून दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या कारवाईवर कोणीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला नाही. भारतीय लष्कराचे सामर्थ्य संपूर्ण जगाने पाहिले आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी व्हर्जिनियातील टायसन्स कॉर्नरमधील रिर्ट्झ कार्लटन येथे बोलताना म्हटले.

पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात बोलताना दहशतवादावर भाष्य केले. ‘भारताने २० वर्षांपूर्वी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र त्यावेळी जगातील अनेक देशांनी त्याकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेच्या नजरेतून पाहिले. त्यावेळी कोणीच त्याकडे दहशतवादाच्या दृष्टीकोनातून पाहिले नाही. आता दहशतवाद काय असतो हे दहशतवाद्यांनीच सर्व जगाला सांगितले आहे. त्यामुळे आता दहशतवाद काय असतो, हे जगाला सांगण्याची गरज उरलेली नाही,’ असेदेखील पंतप्रधान मोदींनी म्हटले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने तीन वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामांचादेखील उल्लेख केला. ‘भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे देशाच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला घडले. भारताची भूमिका कायम संयमाची राहिली आहे. मात्र ज्यावेळी आवश्यकता असेल, त्यावेळी भारत आपल्या शक्तीचे दर्शन घडवू शकतो,’ असे यावेळी मोदींनी म्हटले. भारत अनेकदा दहशतवादी हल्ल्यांना बळी पडला आहे असे म्हणत ‘दहशतवादाचे परिणाम किती भयंकर असू शकतात, हे आम्ही अनेकदा जगाला सांगितले आहे,’ असेदेखील मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनवर टीका केली. ‘भारत हा जागतिक नियम मानणारा देश आहे. जगाच्या नियमांच्या चौकटीत राहूनच आम्ही ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. भारताने कायम विकासाचा मार्ग धरला आहे. जागतिक नियमांच्या चौकटीत राहणे हा भारताचा इतिहास असून तीच भारताची संस्कृती आहे,’ असे म्हणत भारतीय दक्षिण चिनी समुद्रात चीनकडून सुरु असलेल्या दांडगाईवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले.