पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सिंगापूरमधील भारतीयांना संबोधित करताना भारत सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम बाजारपेठ असून जगाला भारताकडून मोठ्या आशा असल्याचे सांगितले. सिंगापूर हा भारताचा आर्थिक भागीदार असून सिंगापूरच्या चांगी विमानतळाच्या धर्तीवर भारतात दोन विमानतळांच्या उभारणीसाठी सिंगापूरची मदत होणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. तसेच स्मार्ट सिटीच्या उभारणीसाठी येथील काही कंपन्यांचे सहाय्य लाभणार असल्याचेही ते म्हणाले.

विकासाच्या दृष्टीकोनातून सिंगापूरकडून भरपूर शिकण्यासारखे असून गेल्या पन्नास वर्षात येथे झालेली प्रगती लक्षणीय आहे. येथील लोकांनी लोकांसाठी काम केले आहे. देश नागरिकांच्या इच्छाशक्तीवर चालतो त्यामुळे नागरिकांची स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठी ते करत असलेले काम महत्त्वाचे असल्याचे सांगत मैत्रीच्या आधारे भारताचे आणि जगाचे भले व्हावे यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचे मोदी म्हणाले. तसेच भारतात सुरू केलेल्या विविध योजनांची आणि विकास कामांची माहितीही मोदींनी यावेळी दिली.
‘स्वच्छ भारत’ मोहिमेचाही मोदींनी आवर्जुन उल्लेख केला. भारतीय नागरिक स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.