कल्पना करा.. एकदम चकाचक रस्ता, रस्त्यात एकही खड्डा नाही. या रस्त्यावरून बस धावते आहे. या बसमध्ये खिडकीशेजारी बसून तुम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळत आहात. बसही अगदी आरामात पुढील दिशेने चालली आहे. प्रवासाचा छान आनंद तुम्ही घेता आहात इतक्यात तुमचे लक्ष चालकाच्या सीटकडे जाते आणि लक्षात येते आतापर्यंत तुम्ही प्रवासाचा आनंद ज्या बसमध्ये बसून घेत होता. त्या बसला चालकच नव्हता. पण ही कल्पना नाही हे वाहतुकीचे भविष्य आहे…त्यामुळे एखादी गाडी जर तुम्ही चालकाशिवाय पाहिली तर दचकून जाऊ नका. कारण नुकतीच मर्सिडिज आणि डाम्लर बसेस या कंपनीने तयार केलेली स्वयंचलित बस नेदरलँडच्या रस्त्यावर धावली.
ही बस चालकांविना रस्त्यावर धावू शकते. या बसमध्ये चालक असतो पण तो नावापुरता. कोणत्या वळणावर वळायचे, कुठे थांबायचे, समजा रस्त्यात खड्डा आला तर तो कसा चुकवायचा, ट्रॅफिकमधून कसा मार्ग काढायचा हे सगळेच या बसला चांगले ठाऊक आहे. स्वयंचलित तंत्रज्ञान असलेल्या बसमध्ये अत्याधुनिक कॅमेरा सिस्टीम बसवण्यात आली आहे त्यामुळे जर रस्त्यात एखादा अडथळा आला तरी तो अडथळा ही बस सहज पार करत पुढे जाते.
या बसमध्ये प्रवशांसाठी काही सोयीसुविधा देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या फ्युचर बसमधला प्रवास प्रवाशांसाठी नक्कीच आनंद देणारा ठरणार आहे. या बसची ही फक्त चाचणी होती. ही बस प्रत्यक्षात यायला मात्र काही महिन्यांचा अवधी जाणार आहे.