जगातील सर्वात लठ्ठ महिला असलेल्या इमान अहमदचा अबूधाबी येथील रूग्णालयात सोमवारी सकाळी मृत्यू झाला. आठवड्याभरापूर्वीच इमानने तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला होता. तसेच काही महिन्यांपूर्वी तिच्यावर मुंबईत ‘वेट लॉस सर्जरी’ही (वजन कमी करण्यासंदर्भातील शस्त्रक्रिया) करण्यात आली होती. अबूधाबीच्या बुरजील रूग्णालयाने इमानचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. हृदय प्रक्रिया बंद पडल्याने आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

इमानवर २० डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. २० डॉक्टरांच्या टीममध्ये वैदकीय शास्त्रातील विविध विषयांमधील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. तिला आम्ही वाचवू शकलो नाही याचे वाईट वाटते. तिच्या मृत्यूबाबत समजताच तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही रूग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आलेक्स्झांड्रिया या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या अहमदने इमानला मुंबईतील सैफी रूग्णालयात ‘वेट लॉस सर्जरी’साठी दाखल केले होते. तिला दाखल करण्यात आले तेव्हा तिचे वजन ५०४ किलो होते. त्यानंतर तिला रूग्णालयातून जेव्हा अबूधाबीला पाठवण्यात आले तेव्हा तिचे वजन ३०० किलो कमी झाले होते.

मुंबईतून इमानला पाच महिन्यांपूर्वीच अबूधाबीला पाठवण्यात आले होते. पोलिसांनी तिच्यासाठी खास ग्रीन कॉरिडोअरची व्यवस्थाही केली होती. इमानवर उपचार केल्याबद्दल आणि तिचे वजन कमी केल्याबद्दल तिची बहिण शायमाने सैफी रूग्णालयाचे आभारही मानले होते. आता मात्र इमान अहमदचा मृत्यू झाला आहे. ४ मे २०१७ ला तिला अबूधाबीला पाठवण्यात आले. तेव्हापासून आत्तापर्यंत तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र सोमवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली