सूर्याचे वातावरण, सौरडाग यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात लडाख येथे जगातील सर्वात मोठी सौर दुर्बीण उभारली जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च ३०० कोटी रूपये आहे.हानळे किंवा मेरक येथे म्हणजे लडाखमधील पांगाँग सरोवराच्या जवळ हा प्रकल्प उभारला जाणार आहे. हे ठिकाण चीनलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आहे.
सध्या जगातील सर्वात मोठी सौर दुर्बीण ही अमेरिकेतील अॅरिझोनातील कीट पीक नॅशनल ऑब्झर्वेटरी येथे असून तिचे नामकरण ‘मॅकमथ-पीअर्स’ असे करण्यात आले आहे.
सौर दुर्बीण प्रकल्पाच्या उभारणीचे काम २०१३ च्या अखेरीस सुरू होणार आहे, असे मुख्य संशोधक सिराज हासन यांनी सांगितले. शंभराव्या सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने ते येथे आले असताना बोलत होते.
ही सौर दुर्बीण २ मीटर अॅपर्चरची असेल व तिची उभारणी २०१७ पर्यंत होणार आहे व २०२० पर्यंत ती जगातील सर्वात मोठी दुर्बीण असेल. अमेरिका त्यानंतर हवाई बेटांवर ४ अॅपर्चरची दुर्बीण उभारणार आहे. सौरडागांचे निरीक्षण करणे हा त्याचा प्रमुख हेतू आहे. दुर्बिणीतील सुटे भाग विविध ठिकाणी तयार केले जाणार आहेत. जर्मनीतील हॅम्बर्ग वेधशाळेची मदत यात घेतली जाणार आहे. सूर्याचे निरीक्षण करणारे अनेक संशोधक येथे येऊन या दुर्बिणाचा वापर करू शकतील. बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स ही संस्था या प्रकल्पातील मध्यवर्ती संस्था असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था, आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस , टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्च,आयुका,आयआयएसएसी व ‘आयसर’ या संस्था त्यात सहभागी होणार आहेत.