देशातील ‘वाढत्या असहिष्णुतेच्या’ निषेधार्थ आपले पुरस्कार परत करणाऱ्या भारतीय लेखक व कलाकारांना १५० देशांतील लेखकांनी पाठिंबा दिला असून, त्यांना अधिक चांगले संरक्षण पुरवण्यासह त्यांच्या भाषणस्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे आवाहन भाजप सरकारला केले आहे.

जागतिक साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या ‘पेन इंटरनॅशनल’ या जगातील लेखकांच्या आघाडीच्या संघटनेने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात भारत सरकारला एम. एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. या संघटनेचे अध्यक्ष जॉन राल्तसन सॉल यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व साहित्य अकादमी यांना पत्राद्वारे लेखकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

राणा यांच्याकडून पुरस्कार परत

लखनौ:भारतातील सध्याच्या परिस्थितीचा निषेध करताना ऊर्दू कवी मुनावर राणा यांनीही रविवारी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे. राणा यांनी लिहिलेल्या ऊर्दू कवितांसाठी त्यांना २०१४ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. भविष्यात सरकारकडून कोणताही पुरस्कार स्वीकारणार नसल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
पुरस्कार वापसी दुर्दैवी -शिंदे
नागपूर: देशातील असहिष्णू वातावरणाचा निषेध म्हणून साहित्यिकांनी पुरस्कार परत करणे हे केंद्र व राज्य सरकारसाठी दुर्दैवाची बाब आहे, असे मत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी येथे व्यक्त केले.साहित्यिक हा देशाचा आत्मा असतो. या घटकामध्ये अस्वस्थता आहे म्हणून ते पुरस्कार परत करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.