अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात सोशल मीडियावर मोहीम राबवणा-या गुरमेहर कौरवरुन कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यात जुंपली. ‘तुम्ही फक्त कविता लिहिल्या, पण मी देशासाठी इतिहास रचला’ अशा शब्दात योगेश्वर दत्तने जावेद अख्तर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

लेडी श्रीराम कॉलेजच्या गुरमेहर कौर या तरुणाीने अभाविपविरोधात मोहीम सुरु केली होती. गुरमेहर कौरचे वडील कॅप्टन मनदीप सिंग हे कारगिल युद्धात शहीद झाले होते. या मोहीमेवरुन गुरमेहर कौरविरोधात आक्षेपार्ह टीका होती. माझ्या वडीलांना पाकिस्तानने नव्हे, तर युद्धाने मारले अशा आशयाचा एक व्हिडीओदेखील तिने अपलोड केला होता. या व्हिडीओवर गुरमेहर कौरवर निशाणा साधताना योगेश्वर दत्तने हिटलर, लादेनचा फोटो शेअर केला होता. यात आम्ही नव्हे तर बॉम्बने लोकांना ठार मारले असा आशय होता. या पोस्टच्या माध्यमातून योगेश्वर दत्तने गुरमेहर कौरला उपरोधिक टोला लगावला होता.

योगेश्वरच्या या ट्विटवर गीतकार आणि राज्यसभेतील खासदार जावेद अख्तर यांनीदेखील ट्विटच्या माध्यमातूनच उत्तर दिले होते. ‘अशिक्षित कुस्तीपटूने कारगिल युद्धातील शहीदाच्या मुलीची खिल्ली उडवणे मी समजू शकतो. पण उच्चशिक्षितांनीही तिची खिल्ली उडवणे दुर्दैवी आहे’ असे जावेद अख्तर यांनी म्हटले होते. जावेद अख्तर यांच्या या ट्विटवर योगेश्वरनेही प्रत्युत्तर दिले. ‘तुम्ही फक्त कविता लिहिल्या आहेत, पण आम्हीदेखील आमच्या छोट्या कारनाम्यांमधून देशासाठी इतिहास रचला’ असे सणसणीत प्रत्युत्तर योगेश्वर दत्तने दिले आहे.

गेल्या आठवड्यात रामजस महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता. उमर खालीद आणि शेहला रशीद यांच्या भाषणाचा कार्यक्रम कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याविरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान अभाविपने विद्यार्थ्यांना आणि महिला पत्रकारांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत.