भारतीय जनता पक्षाची देशात स्थिती बळकट आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांच्या आधारे आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचे भाकित वर्तविणे अयोग्य ठरेल असे मत केंद्रीय कामगार मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मांडले. तसेच महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील तोमर यांनी व्यक्त केला आहे.
“काहींना या पोटनिवडणुकांच्या निकालांनी आनंदी व्हायचे असेल तर, नक्की व्हावे याला माझा अजिबात विरोध नाही पण, या निकालांच्या आधारे आगामी विधानसभा निवडणुकांबद्दलचा अंदाज व्यक्त करणे चुकीचे आहे. भाजप पक्ष मजबूत असल्याचे महाराष्ट्र, हरयाणा राज्यातील निवडणुकांचे निकाल सिद्ध करतील.” असे तोमर म्हणाले.
भाजपच्या आमदारांनी खासदारकी मिळवल्यानंतर रिक्त झालेल्या २४ जागांसह नऊ राज्यांत झालेल्या ३२ विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीत भाजपला अवघ्या बारा जागा जिंकता आल्या. गुजरात आणि राजस्थानमधील स्वत:च्या ताब्यातील १३ जागांवर भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येण्याचे दावे ठोकणाऱ्या भाजपला या निकालांनी मोठा धक्का दिल्याचे म्हटले जात आहे.