चीनमध्ये कुठल्याही ‘बाह्य़ प्रभावांशिवाय’ धर्माचे पालन करण्यात यावे आणि स्थानिक धार्मिक गटांनी देशाशी निष्ठावंत राहावे, असा इशारा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दिला आहे. अनेक वर्षांच्या शत्रुत्वानंतर व्हॅटिकनशी संबंध सुधारत असतानाच त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
अधिकाऱ्यांनी धार्मिक वर्तुळातील लोकांच्या प्रभावाची किंमत करून त्यांना देशाचा विकास, एकी आणि सुसंवाद यासाठी आणखी चांगले काम करण्याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. मात्र, आपण धार्मिक व्यवहार कायद्यानुसारच करायला हवेत आणि धार्मिक गट आपल्या मर्जीने चालवण्यासाठी स्वातंत्र्याच्या तत्त्वाशी चिकटून राहिले पाहिजे. चीनमधील धर्माचा विकास बाह्य़ प्रभावापासून स्वायत्त असला पाहिजे, असे सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत बोलताना क्षी म्हणाल्याचे वृत्त झिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. चीनमध्ये पसरत असलेल्या ख्रिस्ती धर्माच्या संदर्भात ते हे बोलल्याचे मानले जात आहे.
धर्माना समाजवादी समाजात सामावून घेण्यासाठी सक्रिय प्रयत्न करायला हवेत, मात्र चीनमधील धर्म हे चिनीच हवेत, असे पक्षाचे सरचिटणीस असलेले जिनपिंग म्हणाले.
पक्षाच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या धोरणाची संपूर्ण अंमलबजावणी करण्याचे, तसेच धार्मिक व्यवहार कायद्यानुसार चालवण्याचे आश्वासन क्षी यांनी या वेळी दिले.
चीनचा कारभार निरीश्वरवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत चालवला जात असला, तरी बौद्धवाद आणि ताओवाद यांची मुळे देशात अनेक शतकांपासून रुजली आहेत.